‘झी टॅाकीजवर कॅामेडी अवॉर्ड्स’ची रंगत

0
99

‘कुणी निंदा, कुणी वंदा, हसवणे हाच आमचा धंदा’, असं म्हणत रसिकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या विनोदी कलावंतांचा गौरव करणारा ‘झी टॅाकीज कॅामेडी अवॉर्ड्स सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला. हास्य विनोदाचा जल्लोष असलेल्या या रंगतदार सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन स्वप्नील जोशी व पुष्करराज चिरपुटकर यांनी केले. या दोघांच्या भन्नाट निवेदनाने कार्यक्रमाची रंगत चांगलीच वाढवली. मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील कलाकारांच्या धमाकेदार सादरीकरणाने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. या सोहळ्याचा आस्वाद रविवार ३० जुलैला सायं. ६.३० वा. झी टॅाकीजवर घेता येईल.

 

सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, गश्मीर महाजनी, सुमेध मुधोळकर, बॉबी विज यांच्या नृत्याविष्काराने सर्वांची मने जिंकली. भारत गणेशपुरे, संतोष पवार, प्रियदर्शन जाधव, समीर चौघुले, नम्रता आवटे, शशिकांत केरकर, यांच्या बहारदार स्किटसने उपस्थितांना मनसोक्त हसवले.

यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये ‘वाय झेड’ चित्रपटाने व ‘९ कोटी ५७ लाख’ या नाटकाने पुरस्कार सोहळ्यावर आपली  ठसठशीत मोहोर उमटवली, तर चित्रपट विभागात ललित प्रभाकर याला सर्वोत्कृष्ट नायकाचा तर  सई ताम्हणकर हिने सर्वोत्कृष्ट नायिकेचा मान मिळवला. नाटक विभागात आनंद इंगळे व सुलेखा तळवलकर यांनी बाजी मारली. तसेच पुनरुज्जीवित नाटक विभागात ‘शांतेच कार्ट चालू आहे’ नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला. याच विभागासाठी व याच नाटकासाठी अभिनेता प्रियदर्शन जाधव व अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी पुरस्कार पटकावले.

आपल्या चतुरस्त्र अभिनयाने सिनेनाट्यसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना या सोहळ्यात प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लोकनाट्याचा विशेष पुरस्कार ज्येष्ठ कलावंत वसंत अवसरीकर यांना देण्यात आला. तर वेब निर्मितीचा विशेष ज्युरी पुरस्कार ‘भारतीय डिजीटल पार्टी’ ला मिळाला.

प्रत्येक पुरस्कारागणिक वाढत जाणारी उत्कंठा, सादर होणारे एकापेक्षा एक बहारदार कलाविष्कार आणि त्याला मिळणारी प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद यामुळे ‘झी टॅाकीज कॅामेडी अवॉर्ड्स’ सोहळा रंगतदार झाला. या सोहळ्याचे प्रसारण रविवा ३० जुलैला सायं. ६.३० वा. झी टॅाकीजवर केले जाणार आहे. 

पारितोषिक विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे –

चित्रपट विभाग विजेते

सर्वोत्कृष्ट चित्रपट- व्हेंटिलेटर

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राजेश मापुस्कर ( व्हेंटिलेटर )

सर्वोत्कृष्ट लेखक  – क्षितिज पटवर्धन (वाय झेड)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – ललित  प्रभाकर ( चि व चि. सौ का)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – सई ताम्हणकर (वाय झेड)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अक्षय टांकसाळे (वाय झेड)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शर्मिष्ठा राऊत ( चि व चि. सौ का )

नाटक विभाग  विजेते

सर्वोत्कृष्ट नाटक -९ कोटी ५७ लाख,

सर्वोत्कृष्ट संहिता –  संजय  मोने  (९ कोटी ५७ लाख)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक  – संजय  कसबेकर  ( बाबुराव मस्तानी )

सर्वोत्कृष्ट अभिनेता – आनंद इंगळे (९ कोटी ५७ लाख)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – सुलेखा तळवलकर (९ कोटी ५७ लाख)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सचिन माधव ( बाबुराव मस्तानी )

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – माधवी निमकर (सुरक्षित अंतर ठेवा)

पुनरुज्जीवित नाटक  विजेते

सर्वोत्कृष्ट पुनरुज्जीवित नाटक – (शांतेचं कार्ट चालू आहे),

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – विजय  केंकरे (शांतेचं कार्ट चालू आहे)

सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रियदर्शन जाधव (शांतेचं कार्ट चालू आहे)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  – विशाखा सुभेदार (शांतेचं कार्ट चालू आहे)

Leave a Reply